Templesinindiainfo

Best Spiritual Website

Dagdusheth Ganpati Temple Frequently Asked Questions in Marathi

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?:

भक्तांच्या नावाने दगडूशेठ गणपती जगविख्यात कसा झाला ?

Answer:सन १९६८ साली गणपतीची शाडू मातीची नवी मूर्ती तयार करून घेताना त्याच्या पोटात गणेश यंत्र बसवण्यात आलेले आहे. या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपासून आजपर्यंत लोकांचा या बाप्पाकडे असलेला ओढा वाढत आहे. या भाविकांच्या धार्मिक श्रद्धांना ट्रस्टने सामाजिक कामाची यथायोग्य जोड दिली तसेच ट्रस्टला या बाप्पाचे पहिले भक्त दगडूशेठ हलवाई यांचे नाव दिल्याने दगडूशेठ गणपती जगविख्यात झाला.

लक्ष्मी रस्ता नाव कसे पडले ?

Answer: लक्ष्मीबाई या दगडूशेठ हलवाई यांच्या पत्नी, सात्विक व धार्मिक वृत्तीच्या. त्यांनी गणपती बाप्पा आणि श्री दत्तात्रेय यांची मुलाप्रमाणे मनोभावे सेवा केली. त्यांच्या पश्चात त्यांचे नाव गणपती उत्सव साजरा होतो त्या ठिकाणापासून डेक्कनजिमखानापर्यंतच्या रस्त्याला देण्यात आले.

देवदासींची मुले समाजात ताठ मानेने आज कशी उभी राहिली ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवाच्या परिसरातच देवदासींची वस्ती आहे. या देवदासींच्या मुलांसाठी ट्रस्टने कोंढव्यात बालसंगोपन केंद्र सुरू केले. त्यांच्या रहाण्याची, खाण्यापिण्याची तजवीज करतानाच त्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले त्यामुळेच देवदासींची मुले समाजात आज ताठ मानेने उभी राहिली आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कोणाच्या प्रेरणेतून झाली ?

Answer: लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा कऱण्याचे आवाहन केल्यावर १८९३ साली दगडूशेठ हलवाई यांनी पुढाकार घेऊन बाहुलीच्या हौदावर गणेशोत्सव सुरू केला.

समाजातील व्देष, अंध:कार, जातीपातीतील दरी दूर करण्यासाठी १९७२च्या उत्सवात कोणते पाऊल उचलले गेले ?

Answer: गणेशोत्सव सर्व समावेशक होण्यासाठी १९७२ साली दलित व मेहेतर समाजाच्या जोडप्यांच्याकडून गणपती बाप्पाची पूजा व आरती करून ट्रस्टने नवा आदर्श समाजापुढे ठेवला.

कोणत्या राष्ट्रपतींनी दगडूशेठ गपणतीबाप्पाची उत्सवात येऊन आरती केली ?

Answer: भारताचे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी गणेशोत्सवात येऊन दगडूशेठ गणपती बाप्पांची आरती केली.

अंधश्रद्धेला खतपाणी घालणा-या गणपती दूध पितो या विषयात दगडूशेठ ट्रस्टची भूमिका काय होती ?

Answer: गणपती दूध पितो अशी अफवा महाराष्ट्रात झपाट्याने पसरली आणि लोक दूध घेऊन गणपती मंदिरासमोर रांगाकरून उभे राहू लागले. हीच बाब त्यावेळच्या ट्रस्टींना समजल्यावर त्यांनी, ”आमचा गणपती दूध पित नाही कोणीही दूध आणू नये” असा फलकच चक्क गणपती मंदिराबाहेर लावून मंदिर दर्शनासाठी बंद केले.

देवदासींची मुले समाजात ताठ मानेने आज कशी उभी राहिली ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव जेथे साजरा होतो त्या परिसरात देवदासींची वस्ती आहे. या देवदासींच्या मुलांसाठी ट्रस्टने कोंढव्यात बालसंगोपन केंद्र सुरू केले. त्यांच्या रहाण्याची, खाण्यापिण्याची तजवीज करतानाच त्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले त्यामुळेच देवदासींची मुले समाजात आज ताठ मानेने उभी राहिली आहेत.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून ट्रस्टने राष्ट्रीय एकात्मता कशी साधली ?

Answer: गणेशोत्सवात विविध सजावटी करताना देशातील विविध राज्यातील महाल, राजवाडे आणि मंदिरांच्या प्रतिकृतीच सजावट म्हणून करत ट्रस्टने राष्ट्रीय एकात्मता साधली.

दिशाहिन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला योग्य दिशा देण्यासाठी उचललेले पहिले पाऊल कोणते ?

Answer: दिशाहिन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला योग्य दिशा देण्यासाठी ट्रस्टने उत्सवात धार्मिक उपचारांना प्राधान्य दिले. स्पीकर्सचा अनावश्यक वापर बंद केला आणि सर्व गणेश मंडळांसाठी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केली आणि गणेश मंडळांसाठी ४० कलमी आचार संहिता तयार केली.

सर्व समाजाच्या समावेशकतेसाठी व विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी उचललेले पहिले पाऊल कोणते ?

Answer: सर्व समाजाच्या समावेशकतेसाठी व विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी गणेशोत्सवात पहाटे शालेय विद्यार्थ्यांचे गणपती अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम उत्सव मंडपात सुरू केला.

महिलांचा उत्सवातील सहभाग वाढवण्यासाठी उचललेले पहिले पाऊल कोणते ?

Answer:गणेशोत्सवातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी शताब्दी वर्षापासून गणेशोत्सवात ऋषीपंचमीच्या दिवशी २१००० महिलांसाठी गणेश पूजन व अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू केला.

समाज प्रबोधनासाठी सुरू केलेल्या व्याख्यानमालेत कोणकोणत्या नामवंतांनी सहभाग घेतला ?

Answer: समाज प्रबोधनासाठी सुरू केलेल्या व्याख्यानमालेत प्राचार्य शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, एस. एम जोशी, कॉम्रेड डांगे, ग. प्र.पधान, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, सेतुमाधवराव पगडी रामभाऊ म्हळगी अशा अनेक नामवंतांनी सहभाग घेतला आहे.

समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी उचललेले पाऊल कोणते ?

Answer: समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी ट्रस्टने वीट भट्टी कामगारांना मालकी हक्काची घरे बांधून दिली. आर्थिक दुर्बल घटकाना अर्थ सहाय्य करण्यासाठी सुवर्णयुग सहकारी बँकेची स्थापना केली.

आरोग्यसेवेचा शुभारंभ कोणत्या उपक्रमाने झाला ?

Answer: ट्रस्टच्या आरोग्य सेवेचा शुभारंभ रुग्णवाहिका व जिल्ह्यातील पोलिओ निर्मूलन रूग्णवाहिकेव्दारे झाला.

कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान कसा केला ?

Answer: कर्तृत्ववान व्यक्तींचा कृतज्ञता पुरस्कारने गौरव करून त्यांच्या कार्याचा सन्मान ट्रस्टने केला आहे.

ट्रस्टने आत्पकालीन मदत कशी व कधी केली ?

Answer: ट्रस्टने दुष्काळग्रस्तांसाठी धान्य, शिधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देऊन आपदग्रस्तांना मदत केली आहे.

पंढरपूरच्या आषाढवारीतील योगदान काय आहे ?

Answer: पंढरपूरच्या आषाढी वारीत ट्रस्टच्यावतीने पायी चालणा-या वाकर-यांवर आजारपणात मोफत उपचार कऱण्यासाठी ट्रस्टच्यावतीने तीन रूग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक आणि ओषधे, पाण्याचे दोन टँकर दरवर्षी पाठवण्यात येतात.

दगडूशेठचा संगीत महोत्सव कसा सुरू झाला ?

Answer: दगडूशेठ हलवाई गणपतीचे बुधवारपेठेतील हौदावर १९८४ साली मंदिर झाले. या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ट्रस्टने रसिकांसाटी गुढीपाडवा ते रामनवमी असे संगीत महोत्सव त्या वर्षीपासून मोफत आयोजित करण्यास सुरूवात केली.

सुवर्णयुग तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगमंचावर गाजलेल्या कोणत्या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग केला ?

Answer: सुवर्णयुग तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेबंदशाही या गाजलेल्या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग केला होता.

“वाटचाल देवमंदिरा बरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे” ही संकल्पना ट्रस्टने कधी आणली ?

Answer: गणपती बाप्पांच्या मंदिराच्या विस्तारीकरणापासून ट्रस्टने वाटचाल देवमंदिराबरोबरच मानवसेवेच्या महामंदिराकडे ही संकल्पना आणली आणि कामाला सुरूवात केली.

गणेशोत्सवातील मातीच्या मूर्तीच्या पहिल्यांदा मंदिर कधी व कुठे बांधले ?

Answer: गणेशोत्सवातील मातीच्या मूर्तीचे पहिल्यांदा मंदिर बुधवारपेठेतील हौदावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे १९८४ साली झाले.

या मंदिराचा विस्तार कधी केला ? मंदिरात चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना का केली आहे ?

Answer: या मंदिराचा विस्तार सन २००५ साली कऱण्यात आला. विस्तारीत मंदिरावर कळस आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती दरवर्षी उत्सवासाठी कोतवाल चाव़डी येथे नेण्यात असल्याने ती चल मूर्ती आहे. मंदिरावर कळस चढवायचा असेल तर शास्त्रानुसार मंदिरात स्थिर मूर्तीची प्रतिष्ठापना कऱणे आवश्यक असते. म्हणून मंदिरात चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात गणेश याग करण्याची परंपरा कधी सुरू केली ? त्याचे पौरोहित्य कुणी केले ?

Answer: गणेशोत्सवातील गणेश य़ाग करण्याची परंपरा ट्रस्टने सन १९७४ पासून सुरू केली. तेव्हा त्याचे पौरोहित्य श्री किंजवडेकर शास्त्री, श्री यशवंत राहुरकार आणि श्री नटराजशास्त्री यांनी केले होते. ही परंपरा आज श्री नटराजशास्त्री आणि श्री मिलिंद राहुरकर पुढे चालवत आहेत.

ट्रस्टने शताब्दी महोत्सव कधी साजरा केला ?

Answer: ट्रस्टने शताब्दी महोत्सव १९९२ साली साजरा केला.

या शताब्दी महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य काय होते ?

Answer: या शताब्दी महोत्सवात सलग ५५ दिवस सणस मैदानावर धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, किर्तन, भजन, व्याख्यानमाला, संगीत महोत्सव असे भरगच्च कार्यक्रांचे आयोजन कऱण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम भाविक, रसिकांसाठी मोफत होते.

शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कोणता नवा उपक्रम सुरू केला ?

Answer: शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टने सुवर्णयुग स्पोर्टस क्लब चा नविन उपक्रम सुरू केला.

शताब्दी वर्षात महिलांच्या उत्सवातील सहभाग वाढवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला ? अन्य कोणता उपक्रम खास महिलांसाठी सुरू केला ?

Answer: शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टने सुवर्णयुग स्पोर्टस क्लब हा महिला खेळाडूंचा कबड्डी संघ सुरू केला. गणेशोत्सवात महिलांचा सहभाग वाढण्यासाठी उत्सवात ऋषी पंचमीच्या दिवशी महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरतीचा कार्यक्रम आयोजित कऱण्यास सुरूवात केली.

पिताश्री वृद्धाश्रम आणि बालसंगोपन केंद्र कुठे आहे ? हे उपक्रम कधी सुरू केले ?

Answer: पिताश्री वृद्धाश्रम आणि बालसंगोपन केंद्र हे कोंढवा येथे आहे. बालसंगोपन केंद्र १९८५ साली तर वृद्धाश्रम २००४ साली सुरू करण्यात आला.

ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार सहजपणे मिळावता यावा म्हणून ट्रस्टने कोणती संस्था सुरू केली ?

Answer: ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार मिळावा यासाठी ट्रस्टने अत्यल्प फी मध्ये “आयटीआय” कोंढवा येथे सुरू केले. काही वर्षापूर्वी व्होकेशनल कॉलेज सुरू केले आहे.

जय गणेश म्हणून अभिवादन करायला ट्रस्टने कधी सुरूवात केली ?

Answer: गणपती बाप्पाचे नवीन मंदीर झाल्यावर ट्रस्टने जय गणेश म्हणून एकमेकांना अभिवादन कऱण्यास सुरूवात केली.

दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य काय ?

Answer: आकर्षक विद्यूत रोषणाईचा रथ, मोजकी पथके, पांढ-या पोषाखातील हजारो कार्यकर्ते, भाविक, मिरवणूक मार्गावर बाप्पांच्या आरतीसाठी तास न तास वाट बघणारे भाविक, लाखोंचा जनसमुदाय ही विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचा उत्सव कुठे साजरा केला जातो ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव शिवाजी रस्त्यावर (जुनी कोतवाल चावडी) येथे साजरा केला जातो.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचा उत्सव सुरूवातीला कोणत्या नावाने ओळखला जात असे ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव सुरूवातीला “बाहुलीच्या हौदाचा गणपती” या नावाने ओळखला जात असे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांना इंग्रजांनी कोणता किताब दिलेला होता ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलावाई यांना इंग्रजांनी “नगरशेठ” हा किताब दिला होता.

दगडूशेठ हलवाई हे कोणत्या तालमीचे वस्ताद होते ? ती तालीम कोणी बांधली ?

Answer: दगडूशेठ हलवाई हे जगोबादादा तालमीचे वस्ताद होते. ती तालीम दगडूशेठ हलवाई यांनीच बांधली आहे.

दगडूशेठ हलवाईंचे निवासस्थान कुठे होते ?

Answer: दगडूशेठ हलवाई यांचे निवासस्थान हे सध्याचे बुधवारपेठेतील श्रीदत्त मंदिर आहे त्याच ठिकाणी होते. हे दत्तमंदीर हे दगडूशेठ हलवाई यांच्या घरातील दत्त मंदीर होते.

दगडूशेठ हलवाई यांनी कोणत्या सत्पुरूषांबरोबर कुस्ती खेळली ?

Answer: दगडूशेठ हलवाई यांनी सदगूरू जंगली महाराज यांच्या बरोबर कुस्ती खेळली होती.

दगडूशेठ हलवाईंनी सार्वजनिक गणेशोत्सव कुणाच्या प्रेरणेने सुरू केला ?

Answer: दगडूशेठ हलवाई यांनी सार्वजनिक गणेशोत्सव त्यांचे अध्यात्मिक गुरू श्री माधवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने सुरू केला.

तो उत्सव किती साली सुरू झाला ?

Answer: तो उत्सव सन १८९३ साली सुरू झाला.

दगडूशेठ हलवाई यांनी पुढाकार घेतलेल्या गणेशोत्सवात त्यांचा नेमका सहभाग काय होता ?

Answer: दगडूशेठ हलवाई यांनी पुढाकार घेतलेल्या गणेशोत्सवात त्यांनी कागद्याच्या लगद्यापासून गणपती बाप्पाची मूर्ती स्वखर्चाने उत्सवासाठी करून दिली आणि आळीतून लोकवर्गणी काढून त्यातून उत्सव साजरा कऱण्यात आला.

दगडूशेठ हलवाई गणतीच्या उत्सवात मंडपात बसून अभिषेक करण्यास कधी सुरूवात झाली ?

Answer: दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सव मंडपात बसून भाविकांनी अभिषेक व पूजा करण्यास सन १९७४ साली सुरूवात झाली.

देशाच्या संघाचे नेतृत्व करणा-या सुवर्णयुग स्पोर्टसक्लबच्या खेळाडूचे नाव काय ? त्यांच्या नेतृत्वाखाली कोणता कप भारताने जिंकला ?

Answer: सुवर्णयुग स्पोर्टस क्लबची सुमती पुजारी हिने भारताच्या महिला कबड्डी संघाचे नेतृत्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला महिला आशियाई कबड्डी चषक जिंकला.

राष्ट्रीय संघातून खेळलेली या क्लबची दुसरी गाजलेली खेळाडू कोण ?

Answer: या क्लबची राष्ट्रीय संघातून खेळणारी दुसरी गाजलेली खेळाडू म्हणजे दिपिका ज्योसेफ होय.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कोण ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे तात्यासाहेब उर्फ प्रतापराव गोडसे हे संस्थापक अध्यक्ष होत.

दगडूशेठ हलवाई गणपतीला नारळ्या गणपती का म्हणत असत ?

Answer: दगडूशेठ गणपतीला सुरूवातीपासूनच उत्सवात भाविकाकडून श्रद्धेपोटी नारळ अर्पण कऱण्याची परंपरा आहे. गणपती बाप्पांच्या दोन्ही बाजूला नारळाचे ढीग लागत असत. त्यामुळे या गणपतीला लोकांनी नारळ्या गणपती म्हणायला सुरूवात केली.

दगडूशेठ गणपतीचे मंदीर कोणत्या शैलीत बांधण्यात आलेले आहे ?

Answer: दगडूशेठ गणपतीचे मंदिर गाणपत्य शैलीत बांधण्यात आले आहे.

या मंदिरात बाप्पांची स्थापना झाल्यानंतर कोणतकोणते उत्सव साजरे कऱण्यास सुरूवात झाली ?

Answer: या मंदिरात बाप्पांची स्थापना झाल्यानंतर ट्रस्टने सर्व धार्मिक सणांबरोबरच गुढी पाडवा, गणेश जयंती, त्रिपुरी पौर्णिमा, आंबा महोत्सव, मोगरा महोत्सव, शहाळे महोत्सव असे उत्सव साजरे करायला सुरूवात केली.

मंदीरात गणेश याग कधी करण्यात येतो ?

Answer: मंदिरात दर मंगळवारी, विनायकी चतुर्थी, अंकारकी चतुर्थी आणि प्रमुख सणांच्या दिवशी गणेश याग करण्यात येतो. या यागासाठी कोणत्याही भाविकाला बसता येते.

महत्वाच्या सणावारी मंदिरात गणेश यागाबरोबर पहाटे कोणता कार्यक्रम करण्यात येतो ?

Answer: महत्वाच्या सणावारी मंदिरात गणेश यागाबरोबर पहाटे स्वराभिषेक करण्यात येतो.

हा कार्यक्रम कोणासाठी असतो ?

Answer: हा कार्यक्रम म्हणजे गणपती बाप्पासाठी स्वरपूजा असते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गपणती मंदिरा लगत कोणते मंदिर आहे ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालगत श्री वृद्धेश्वराचे मंदीर आहे.

जय गणेश रुग्णसेवा अभियानाची व्याप्ती कोणत्या रूग्णालयापर्यंत पोचली आहे ?

Answer: जय गणेश ऋग्णसेवेची व्याप्ती ही ससून रूग्णालयातील गरीब रूग्णांच्या सेवेपर्यंत पोचली आहे.

ससून रूग्णालयातील रूग्णांना रोज ट्रस्टच्यावतीने काय काय देण्यात येते ?

Answer: ट्रस्टच्यावतीने ससून रूग्णालयातील सुमारे १२०० रूग्णांना रोज दोनवेळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देण्यात येते.

ससून रूग्णालयात ट्रस्टच्यावतीने कोणत्या सुधारणा करून देण्यात येत आहेत ?

Answer: ट्रस्टने या रूग्णालयात ५०० चौरस फूटांच्या किचनचे नूतनीकरण व अधिनिकीकरण, महिला व मुलांच्या वॉर्डसह ५ वॉर्डचे नूतनीकऱण केले, रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रांती कक्ष उभारला आहे. नवजात अर्भकांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने फिनोलेक्स ग्रूपच्या मुकुल माधव फाउंडेशन व इतर संस्थांच्या मदतीने एनआयसीयुची अद्यायावत सुविधा दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर उपाय म्हणून ट्रस्टने कोणता उपक्रम सुरू केला ?

Answer: विद्यार्थी आत्महत्यांच्या प्रश्नावर उपाय म्हणून ट्रस्टने जय गणेश ज्ञानवर्धन अभियान सुरू करून त्याव्दारे ५५० गरीब, गरजू हुषार मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.

ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यी कोणत्या माध्यामाच्या शाळेतील आहेत ?

Answer: हे सर्व विद्यार्थी पुणे शहरातील मराठी माध्यमाच्या शाळेतील आहेत.

ज्ञानवर्धन अभियानात विद्यार्थ्यांना काय काय देण्यात येते ?

Answer: या अभियानात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य, विमा कवच, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन देण्यात येते

विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धन अभियानात कोणते उपक्रम सुरू केले ?

Answer: विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग, कराटे वर्ग, सहली, समूपदेशन, आरोग्य तपासणी असे उपक्रम सुरू केले आहेत.

मंदिरात रोज किती वेळा आरती होते ?

Answer: मंदिरात रोज सकाळी ७.३० मि सुप्रभात आरती, दुपारी १.३० मि नैवेद्य आरती, ३.३० मि माध्यान आरती, ८.३० मि. महाआरती आणि रात्री १०.३० मि. शेजारती अशा पाच वेळा गणपती बाप्पाची आरती होते.

भक्तांसाठी मंदिरात दर्शन, प्रार्थनेशिवाय अन्य कोणत्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत ?

Answer: भक्तांना मंदिरात दर्शन, प्रार्थनेशिवाय महापूजा, अभिषेक आणि गणेश यागा करण्याच्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.

मंदिराच्या कळसाचा आकार कशासारखा आहे ?

Answer: मंदिराच्या कळसाचा आकार मंगल कलशासारखा आहे.

मंदिराच्या कळसावरील ध्वजावर कोणात्या देवतेची प्रतिमा आहे ?

Answer: मंदिराच्या ध्वजावर मारूतीरायाची प्रतिमा आहे.

मंदिरात कोणाकोणाच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत ?

Answer: मंदिरात अष्टविनायक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, त्यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई, त्यांचे अध्यात्मिक गुरू श्री माधवनाथ महाराज आणि ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.

मंदिराच्या मुख्य प्रवेश व्दारात व्दारपाल म्हणून कोणाच्या प्रतिमा आहेत ?

Answer: मंदिराच्या दारात गणेश गण असलेल्या मोद आणि प्रमोद या व्दारपालांच्या प्रतिमा आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर कोणत्या पेठेत आहे ? मंदिराशेजारची ठळक खूण कोणती ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदीर बुधवार पेठेत असून बुधवार चौक ही मंदिराच्या शेजारची ठळक खूण आहे.

सन २०१३ च्या दुष्काळात ट्रस्टने कोणते गाव पाच वर्षासाठी दत्तक घेतले ?

Answer: सन २०१३ च्या दुष्काळात ट्रस्टने पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गाव पाच वर्षासाठी दत्तक घेतले.

दुष्काळावर मात करण्यासाठी गावात ट्रस्टने कोणते मुख्य काम केले ?

Answer: दुष्काळावर मात करण्यासाठी ट्रस्टने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात असलेल्या धरणातील गाळ काढून दिला.

ट्रस्टने पिंगोरी गावात इतर विकासाची कोणती कामे केली ?

Answer: पिंगोरी गावाची ट्रस्टच्या ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता केली, ट्रस्टने गावातील शेतक-यांना ठिबक सिंचनासाठी मार्गदर्शन केले, गोशाळा उभारण्यात येत आहे. गावात ५० हजार झाडे लावली. गावच्या शाळेला ई लर्निंगची सुविधा दिली.

गणेशोत्सवात प्रतिष्ठापना कोणाच्या हस्ते कऱण्याची परंपरा आहे ?

Answer: अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीच्या हस्ते गणेशोत्सवात प्राणप्रतिष्ठा करण्याची परंपरा आहे.

गणेशोत्सवात श्रींची आगमन मिरवणूक कोणत्या रथातून काढण्यात येते ?

Answer: गणेशोत्सवात श्रींची आगमन मिरवणूक फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून काढण्याची परंपरा आहे.

विसर्जन मिरवणुक कोणत्या रथातून काढण्यात येते ?

Answer: दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक आकर्षक विद्यूत रोषणाईच्या रथातून काढण्यात येते.

उत्सवात कोणकोणत्या धार्मिक विधीत भाविकांना सहभागी होता येते ?

Answer: उत्सवात भाविकांना उत्सव मंडपात श्रींची महापूजा, अभिषेक आणि गणेश याग या धार्मिक विधीत सहभागी होता येते.

दगडूशेठ गणपतीचे विसर्जन कोणत्या घाटावर केले जाते ?

Answer: दगडूशेठ गणपतीचे विसर्जन डेक्कन जिमखाना येथील पांचाळेश्वर घाटावर गेली १८९३ पासून करण्यात येत आहे.

ट्रस्टने लोकवर्गणी काढण्याची परंपरा कधी बंद केली ?

Answer: ट्रस्टने लोकवर्गणी काढण्याची परंपरा १९९२ पासून बंद केली.

दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीत शिस्त असावी यासाठी कोणत्या नव्या परंपरा सुरू केल्या ?

Answer: विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळणे बंद केले, फटाके उडवण्याची प्रथा बंद केली आणि सर्व कार्यकर्ते, गणेश भक्त याना पांढरे कपडे परिधान करून मिरवणुकीत सामील होण्याचे आवाहन केले.

विसर्जन मिरवणुकीतील गणपती बाप्पाचा रथ कशाच्या सहाय्याने ओढला जातो ?

Answer: विसर्जन मिरवणुकीतील गणपती बाप्पाचा रथ हा पांढ-या रंगाच्या चार खिल्लारी बैल जोड्या ओढतात.

विसर्जन मिरवणुकीत दगडूशेठ गणपतीच्या पुढे कोणता गणपती असतो ?

Answer: विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पुढे अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानानचा रथ असतो.

ट्रस्टने लाल मातीतील कुस्तीच्या हिंद केसरी स्पर्धा केव्हा आयोजित केल्या होत्या ?

Answer: ट्रस्टने लाल मातीतील हिंद केसरी स्पर्धा १९९२ शताब्दी महोत्सवात आणि २०१७ साली शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात आयोजित केल्या होत्या.

ट्रस्टने अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा कधी आयोजित केल्या होत्या ?

Answer: ट्रस्टने अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा १९९२ आणि २००७ साली आयोजित केल्या होत्या.

ट्रस्टने राज्यस्तरीय खो खो स्पर्धा केव्हा आयोजित केल्या होत्या ?

Answer: ट्रस्टने राज्यस्तरीय खो खो स्पर्धा १९९२ साली शताब्दी महोत्सवात आयोजित केल्या होत्या.

ट्रस्टने राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा केव्हा आयोजित केल्या होत्या ?

Answer: ट्रस्टने राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा १९९२ साली शताब्दी महोत्सवात आयोजित केल्या होत्या.

ट्रस्टने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा केव्हा आयोजित केल्या होत्या ?

Answer: ट्रस्टने निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०१७ साली आयोजित केल्या होत्या.

ट्रस्टने सर्वधर्म समभाव हा देखावा कोणत्या वर्षी साकारला होता ?

Answer: ट्रस्टने सर्वधर्म समभाव हा देखावा १९८७ साली साकारला होता.

मंदिराला कोणकोणत्या भारतरत्न विभूषितांनी भेट दिली ?

Answer: मंदिराला पंडीत भीमसेन जोशी, बिस्मिलाखान, लता मंगेशकर, अटल बिहारी वाजपेयी आदी भारतरत्न विभूषितांनी भेट दिली आहे.

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ कधी झाला ?

Answer: शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ ९ जुलै, गुरूपौर्णिमेच्या दिवशी झाला.

ट्रस्टच्यावतीने निसर्ग संवर्धनाचे कोणते कार्य हाती घेण्यात आले आहे ?

Answer: ट्रस्टच्यावतीने निसर्ग संवर्धनासाठी देहू – आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीच्या मार्गावर वृक्षारोपण करून हरीत वारीच्याव्दारे निसर्ग संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे. यंदाच्या वारीत या कार्याचा शुभारंभ देहू येथे इंद्रायणी काठी आणि वाल्हे येथील माऊलींच्या पालखी तळावर वृक्षारोपण करून करण्यात आला.

ट्रस्टने कुष्ठरूग्णांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी कशी मदत केली ?

Answer: ट्रस्टने पुण्यातील कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील कुष्ठ रूग्णांचा बंद असलेला कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना आतापर्यंत एकूण ६० लाख रूपयांचे रोख अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी मदत केली आहे.

ट्रस्टने हुतात्मा जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला ?

Answer: ट्रस्टने हुतात्मा जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी त्यांची आई किंवा पत्नी यांना शौर्यगौरव पुरस्काराने गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून साडी, रोख रक्कम आणि सन्मान चिन्हं देऊन त्यांचा गौरव केला. तसेच गरीब कुटुंबातील काही हुतात्मा जवानांच्या मुलांची शाळेची फी आजही ट्रस्टतर्फे भरण्यात येत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनगर पुण्यात कोठे आहे ?

Answer: पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगर हे सिंहगड रस्त्यावर आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगरात कोणाची वस्ती आहे ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगरमध्ये वीट भट्टी कामगारांची घरे आहेत.

त्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगर असे नाव का देण्यात आले ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने या वीट भट्टी कामगारांना त्याच्या रहात्या जागेवर घऱे मोफत बांधून दिल्याने या वस्तीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगर असे नाव त्या कामगारांनी दिले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नगराचे उदघाटन कोणी केले ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगराचे उदघाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनी केले आणि त्यांच्याच शुभहस्ते वीटभट्टी कामगारांना घरांचे वितरण करण्यात आले.

ट्रस्टच्या वतीने नववर्षाचे स्वागत केव्हा करण्यात येते ?

Answer: ट्रस्टच्यावतीने नववर्षाचे स्वागत चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा या दिवशी करण्यात येते.

ट्रस्टने नववर्षाच्या स्वागताची कशी परंपरा सुरू केली ?

Answer: गुढीपाडव्याच्या दिवशी ट्रस्टच्यावतीने मंदिराच्या प्रांगणात गुढी उभारण्यात येते. तसेच येणा-या भाविकांना पेढे व गुलाबाचे फूल देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्याची परंपरा ट्रस्टने सुरू केली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दिवाळीच्या दरम्यान पहाटे महिला करत असलेल्या काकड आरतीची सांगता कशाने होते ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दिवाळीच्या दरम्यान पहाटे महिला करत असलेल्या काकड आरतीची सांगता तुलसी विवाहा आणि अन्नकोटने होते.

दगडूशेठ गणपती मंदिरातील तुळशी विवाहाचे वैशिष्ट्य काय ?

Answer: दगडूशेठ गणपती मंदिरातील काकड आरतीसाठी येणा-या महिला बाळकृष्णाला मिरवत मंडईतील साखरीबुबांच्या मठात नेतात. तेथील काकड आरतीच्या महिलांनी तुळशीची सजावट केलेली असते. असा दगडूशेठ गणपती मंदिराचा बाळकृष्ण आणि साखरीबुवा महाराजांच्या मठातील तुलसीचा विवाह थाटामाटात संपन्न होतो

रूग्णवाहिकेनंतर ट्रस्टने तरूणांना रोजगार देणारा कोणता उपक्रम सुरू केला ?

Answer: रूग्णवाहिकेनंतर ट्रस्टने १९९५ साली तरूणांना रोजगारा मिळावा यासाठी कोतवाल चावडीजवळ सार्वजनिक एसटीडी, पीसीओ बूथ सुरू केला होता.

गणेशोत्सावात उत्सव मंडपात गणपती बाप्पाला त्याच्या आवडीच्या रोज वेगवेगळ्या पदार्थांचा भोग लावण्यात येतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कशाचा भोग लावण्यात येतो ?

Answer: गणेशोत्सवात उत्सव मंडपात गणपती बाप्पाला रोज त्याच्या आवडीच्या पदार्थांचा भोग लावण्यात येतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला अत्यंत प्रिय असलेल्या गूळ खोब-याचा भोग लावण्यात येतो. ही भोग मंगलमूर्ती उत्सव मंडपातून मंदिरात आणल्यावर तेथे लावण्यात येतो.

श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या हातात कोणकोणती शस्त्रे असतात ?

Answer: श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्य हातात सकाळी कमळं असतात. नंतर दिवसभर पाश आणि अंकूश असतात. संध्याकाळनंतर त्रिशूळ आणि परशू असतात.

Dagdusheth Ganpati Temple Frequently Asked Questions in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top